Monday, June 16, 2008

इतिहास की पौराणिक कथा

स्वत:बरोबर इतरांचाही बुद्धिभेद करण्यात पटाइत असलेल्या भारतीय मार्क्सवाद्यांनी विनाकारणच History or Mythology हा निरर्थक वाद उकरून काढला आणि प्रभु रामचंद्रांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिह्न उभे केले. ह्या रिकामटेकड्या मार्क्सवाद्यांनी प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत वाचला असता तर ही धूळ उडायचे कारणच नव्हते. महाभाराताप्रमाणे रामायणालाही हा सिद्धांत लागू होतो.
प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत : मन्वंतरातील प्रत्येक महायुगाचे कृत, त्रेता, द्वापार आणि कली असे चार भाग होतात. प्रत्येक युगसमाप्तीनंतर युगप्रलय होतो. महायुग समाप्ती नंतर महाप्रलय तर मन्वंतरसमाप्तीनंतर संधि प्रलय होतो. सध्या कलियुग चालू आहे. महाभारत हे द्वापारयुगात झाले. द्वापारयुगाच्या समाप्तीनंतर जो युगप्रलय झाला त्यात सर्व भौगोलिक परिस्थितीची उलटापालट झाली. डोंगर वाहून गेले आणि त्यांच्या जागी सपाट मैदाने झाली. सपाट मैदानांमधे माती-दगडांचे ढीगच्या ढीग वहात आले आणि त्यांचे विशाल डोंगर झाले. साम्राज्येच्या साम्राज्ये ह्या उलथापालथीत गाडली गेली. हे सर्व डोंगर ढीग उकारून काढले तर कौरव-पांडव-कंस ह्यांच्या अस्तित्वाचे शेकडो पुरावे सापडतील. ह्या प्रलायातून वाचण्यासाठी वाट फुटेल तिकडे माणसं पळत सुटली. जे कसेबसे वाचले त्यांच्या स्मृतीत मात्र महाभारताचा संपूर्ण इतिहास शाबूत राहिला. प्रलय ओसरल्यावर हा समग्र इतिहास त्यांनी आधी भूर्ज पत्रांवर आणि मग कागदावर लिहून काढला. हा इतिहास म्हणजेच आपल्याला सध्या ज्ञात असलेले "महाभारत" होय.
मध्यप्रदेशातील पंचमढी येथील पांडवगुंफा ह्या खरोखरच महाभारतकालीन गुंफा आहेत की नाहीत ह्याबद्दल मात्र वैज्ञानिकांत तसेच इतिहासकारांत मतभेद आहेत. ह्या मतभेदांचाच राजकीय लाभ घेण्यासाठी मार्क्सवादी निरर्थक प्रश्न विचारत आहेत. Carbon Dating सारखी अत्याधुनिक तंत्रे वापरून हे मतभेद नाहीसे करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत.
दुर्योधन-दु:शासन-कंस ह्यांच्या कवटया जीवाश्मांच्या रूपात सापडल्या म्हणजे ह्या उथळ डोक्याच्या मार्क्सवाद्यांची तोंडे बंद होतील; पण त्याच्या कितीतरी अगोदर त्यांचे राजकीय अस्तित्वच संपलेले असेल ...!!!

2 comments:

Girish said...

>>ह्या रिकामटेकड्या मार्क्सवाद्यांनी प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत वाचला असता तर ही धूळ उडायचे कारणच नव्हते.

मार्क्सवादी रिकामटेकडे आहेत यात शंका नाही.पण हे प्रभंजन शास्त्री कोण, त्यांचा सिध्दांत कोणत्या पुराव्यांवर आधारित आहे,त्याची सत्यासत्यता कोणी पडताळून बघितली आहे का या प्रश्नांची उत्तरे दिल्यास बरे होईल.उद्या कोणीही उठून स्वत:ला वाटेल तो सिध्दांत मांडेल. स्वत:ला शास्त्री म्हणवून घेतल्यामुळे हे सिध्दांत बरोबर होतात असे नक्कीच नाही.

>> हे सर्व डोंगर ढीग उकारून काढले तर कौरव-पांडव-कंस ह्यांच्या अस्तित्वाचे शेकडो पुरावे सापडतील.

तसा प्रयत्न कोणी केला आहे का?अमुक केले तर तमुकचे शेकडो पुरावे सापडतील या बोलण्याला काय अर्थ आहे?सिध्दांत वगैरे मोठे शब्द वापरले जातात तेव्हा ती गोष्ट पुराव्यानिशी सिध्द करता आली पाहिजे.संशोधनाच्या जगतात ’असेल’ याला फारसे महत्व नाही.जर मार्क्सवादी लोक हिंदूंच्या श्रध्देवर प्रहार करत आहेत असा आपला दावा असेल तर तो योग्य आहे.पण त्याला सिध्दांत वगैरे मोठ्या शब्दांचा मुलामा देऊ नका ही विनंती.या कारणामुळे हिंदू cause चे नुकसानच होते, फायदा नाही.

>>दुर्योधन-दु:शासन-कंस ह्यांच्या कवटया जीवाश्मांच्या रूपात सापडल्या म्हणजे ह्या उथळ डोक्याच्या मार्क्सवाद्यांची तोंडे बंद होतील

समजा उद्या कवट्या मिळाल्या तरी त्या कवट्या दुर्योधन-दु:शासन-कंस यांच्याच आहेत हे कसे सिध्द करणार?

आपला दावा आहे की रामायण-महाभारत हा इतिहास आहे.तसे असेल तर बुध्दीला पटेल असे पुरावे द्यावेत ही विनंती.माझ्या मते रामायण-महाभारत खरोखर घडले होते हा हिंदूंच्या श्रध्देचा भाग झाला.आणि त्या श्रध्देला कोणी आव्हान देऊ नये.ज्या न्यायाने ’व्हर्जिन मेरी’ येशूला जन्म कसा देऊ शकली हा प्रश्न कोणी विचारत नाही आणि तो श्रध्देचा भाग म्हणून गणला जातो तसाच रामायण-महाभारतही गणला जावा.आणि हो मी हिंदूंच्याच हितरक्षणाचा समर्थक आहे तरीही आपल्या लेखामुळे हिंदू cause चे नुकसान होईल असे राहून राहून वाटते म्हणून ही प्रतिक्रिया.

Samir S. Palsuledesai said...

To Girish,
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
>> स्वत:ला शास्त्री म्हणवून घेतल्यामुळे हे सिध्दांत बरोबर होतात असे नक्कीच नाही.
प्रभंजनशास्त्री हे भारतीय पुराणांचा शास्त्रोक्त दृष्टिकोनातून अभ्यास करणारे महान संशोधक आहेत. Archaeology आणि Anthropology ह्या दोन्ही क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केलेली आहे. विख्यात जर्मन शास्त्रज्ञ वॅगनर ह्याच्या Plate displacement Theory च्या अनुषंगाने प्रभंजनशास्त्रींनी आपला सिद्धांत मांडलेला आहे. पुराव्यांवर आधारित सिद्धांत आणि तर्कावर आधारित सिद्धांत असे सिद्धांतांचे दोन प्रकार असतात. त्यानुसार प्रभंजनशास्त्रींचा सिद्धांत हा "तर्काधारित सिद्धांत" ह्या प्रकारात मोडतो.
>> समजा उद्या कवट्या मिळाल्या तरी त्या कवट्या दुर्योधन-दु:शासन-कंस यांच्याच आहेत हे कसे सिध्द करणार?
त्यासाठीच पुराणांचा सांगोपांग अभ्यास करून महाभारतातील निरनिराळ्या घटनांचा नेमका काळ ठरवण्याचे काम सध्या चालू आहे. ते झाल्यावर Carbon dating सारखं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून सापडलेल्या कवटयांचा नेमका काळ निश्चित केला जाईल. हे दोन्ही कालावधी एकच असल्याचं आढळलं तरंच त्या कवटया खरोखरंच दुर्योधन-दुःशासन ह्यांच्याच आहेत असं म्हणता येईल.
>> माझ्या मते रामायण-महाभारत खरोखर घडले होते हा हिंदूंच्या श्रध्देचा भाग झाला.आणि त्या श्रध्देला कोणी आव्हान देऊ नये.
रामायण-महाभारत ह्या केवळ पुराणातील काल्पनिक गोष्टी आहेत हा सेक्युलरवाल्यांच्या तसेच Ideology वाल्यांच्या अंधश्रद्धेचा भाग झाला. "माकडापासून माणसाची उत्क्रांती झाली" हादेखील अनेक निरीश्वरवाद्यांच्या अंधश्रद्धेचाच भाग झाला. विस्तारभयास्तव सर्वच्या सर्व atheist delusions ची जंत्री इथे देत नाही. पण इथे सांगायचा मुद्दा एवढाच की "अंधश्रद्धेला कोणी आव्हान देऊ नये" हे वाक्य निरीश्वरवाद्यांनाही तंतोतंत लागू पडतं.
आपण हिंदूंच्या हितरक्षणाचे समर्थक आहात हे वाचून बरे वाटले. हल्ली उघड उघड अशी भूमिका घेण्याचं धैर्य दाखवणारी मंडळी कमी आढळतात.

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)