Saturday, May 24, 2008

निरीश्वरवाद आणि ईश्वरवाद

निरीश्वरवाद आणि ईश्वरवाद (कर्मयोग आणि कर्मसंन्यासयोग ) : "विज्ञानाच्या कसोटीवर परमेश्वराच्या अस्तित्वाला कसलाही आधार नाही," असे म्हणणारी बरीच माणसे हया जगात आहेत. मात्र स्वत:ला विज्ञाननिष्ठ समजणारी ही मंडळी जेव्हां उत्क्रांतीवादासारख्या भम्पकगिरीला शास्त्रीय सिद्धान्ताचा दर्जा देतात तेव्हां त्यांची कीव येते. परमेश्वराच्या अस्तित्वाबद्द्ल सतत पुरावे मागत रहाणारी ही मंडळी उत्क्रांतीवादाच्या समर्थनादाखल कसलाही पुरावा देऊ शकत नाहीत. तरीही "उत्क्रांतिवाद" हा शास्त्रीय सिद्धांत म्हणूनच ओळखला जायला पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. निरीश्वरवाद्यांचा हा अशास्त्रीय अट्टाहास "पोरकटपणा" ह्याच सदरात मोडतो.

खरेतर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यास निरीश्वरवाद हा कर्मयोगाचाच भाग समजता येतो. पण चटावरचे श्राद्ध उरकल्यासारखा कर्मयोग आचारणात आणला तर हया पोरकट निरीश्वरवाद्यांसारखे हसे होते . पराबुद्धीद्वारे परमेश्वराचे स्वरूप जाणणे ही योगसाधनेची वरची पायरी आहे. पण अंगी शास्त्रीय दृष्टिकोन बाणवल्याशिवाय पराबुद्धी विकसित होत नाही. म्हणूनच गीता सांगते --

ज्ञानविज्ञानतृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय:

युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन:

भौतिक ज्ञानाचा अभाव असणारी व्यक्ती योगी होऊ शकत नाही आणि भौतिक ज्ञान हे शास्त्रीय दृष्टिकोनाशी विसंगत असू शकत नाही. शास्त्रीय दृष्टिकोन अंगी बाणवण्यासाठी कर्म योगाचे व्यवस्थित आचरण क्रमप्राप्त ठरते. केवळ "परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे" हा शास्त्रीय दृष्टिकोनाला पर्याय होऊ शकत नाही. तुमचा परमेश्वराच्या अस्तित्वावर विश्वास नाही म्हणजे आपोआपच तुमचा शास्त्रीय दृष्टिकोन उच्च दर्जाचा आहे असे होत नाही. भम्पकगिरीला शास्त्रीय सिद्धांत समजणा-यांची बुद्धिमत्ता ही चिम्पान्झीपेक्षाही खालच्या दर्ज्याची भासते.

आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म: कारणमुच्यते

योगारूढ़स्य तस्यैव शम: कारणमुच्यते

म्हणजेच योगसाधनेच्या पूर्वार्धात कर्मयोग व उत्तरार्धात कर्मसंन्यासयोग असे टप्पे केल्यास योग्साधना सुकर होते. विकसित पराबुद्धी द्वारे मायावी जगाची संरचना जाणणे ही परमेश्वराचे विश्वव्यापी स्वरूप जाणण्याच्या अगोदरची पायरी आहे. हया पायरीलाच कर्मसंन्यासयोग असे म्हणतात. केवळ कर्म योगाचेच आचरण करत रहिल्यास योगसाधना अपूर्ण रहाते व परमेश्वराचे नेमके स्वरूप लक्षात येत नाही.

यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव

न ह्यसंन्यस्तसंकल्पो योगी भवति कश्चन

थोडक्यात सांगायचे तर "self conscious adherence to Theism" किंवा कर्मसंन्यासयोगावर आधारलेला ईश्वरवाद म्हणजे "post-science philosophy" आहे. चित्रकलेच्या क्षेत्रात post-modern art ही जी शाखा आहे ती काहीशी अशाच पद्धतीची आहे. "Self conscious allusion to the past" हा post-modern art चा गाभा म्हणजे कर्मसंन्यासयोगच आहे. मात्र चित्रकलेच्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती असल्याशिवाय post-modern art कडे वळणे अर्थहीन ठरते कारण आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवल्याशिवाय भूतकाळात गुंतून रहाणं हा कर्मत्याग होतो. कर्मत्याग किंवा नैष्कर्म्य म्हणजे कर्मसंन्यासयोग नव्हे. दुसरे उदाहरण म्हणजे च्यवनप्राश. च्यवनप्राशची मस्करी करणं ही निरीश्वरवाद्यांची सहजप्रवृत्ती आहे. पण कर्मसंन्यासयोगाचे यथास्थित आचरण करणारा योगीच हे जाणून असतो की, "च्यवनप्राश म्हणजे च्यवनमुनींच्या प्रागतिक व्यक्तिमत्त्वाचे प्रतिक आहे. च्यवनऋषींनी त्यांच्या काळातील अत्याधुनिक औषध पद्धती अंगिकारली होती. त्याचप्रमाणे आपणही सध्याच्या काळातील म्हणजेच एकविसाव्या शतकातील अत्याधुनिक औषधपद्धती अंगिकारली पाहिजे."पण मग सगळे निरीश्वरवादी एकजात गाढव आहेत असं समजायचं का ? कर्मयोग आणि कर्मसंन्यासयोग ह्या बाबतीत पाश्चिमात्त्य तत्त्वज्ञान थोडे वेगळ्या अंगाने जाते. काही विचारवंतांच्या मते ईश्वरवादी भूमिका ही योग साधनेची पहिली पायरी आहे तर निरीश्वरवादी भूमिकेला ते योगसाधनेची उच्च पातळी समजतात. अशा विचारवंतांकडे कर्मसंन्यासयोग ही पायरीच नसल्यामुळे ईश्वरवाद्यांच्यासमोर त्यांचा पोरकटपणा उघडा पडतो. उत्क्रांतीवाद ही भम्पकगिरी आहे हे कळल्यावर ते नुसतेच सैरभैर होतात. पुढे जायचा रस्ता आणि मागे यायचा रस्ता असे दोन्ही रस्ते बंद झाल्यामुळे ते जागच्या जागीच गोल गोल फिरत रहातात. स्वत:च्या आचरटपणाचे समर्थन करण्यासाठी Collaborative Thinking चे म्हणजेच सामूहिक विचार प्रक्रियेचे च-हाट वळत रहाण्याखेरीज त्यांच्या हातात काहीही शिल्लक रहात नाही. त्यांची वैचारिक प्रगती खुंटते आणि मग अशी सैरभैर माणसे समूह तत्त्वज्ञानाचा उदो उदो करत शेवटी संघटित गुन्हेगारीचा हिस्सा बनतात...

(... अपूर्ण ...)

No comments:

Post a Comment

We strongly believe in Freedom of Expression. So, comments or criticism in abusive language also is allowed here.
(of course we retain the authority to delete SPAM !)